मिपावरुन उडललेला पहिला लेख अनामिक काकांच्या सौजन्याने इथे पुन्हा देत आहोत.
धन्यवाद..अनामिक काका! :)
"अरे, अरे, भात असा चांगला कालवून घ्यावा बाळीशा! हे काय, भात एकीकडं आणि वरण एकीकडं! हं, आणि वरण घे थोडसं आणखी. आश्शी! लिंबू पिळलास का? अरे, चवीनं खायला शिकावं बाळीशा! लिंबाची बी काढून टाक ती भातातली, कडू लागेल नाहीतर. आता लहानलहान घास घे. घाई करू नकोस. हं. जमलं बघ आता. कोशिंबीर हवीय का आणखी? मग? कुठली कविता म्हणत होतास मगाशी? काय? जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत? हम्म. म्हणजे या जगातले सगळे लोक तुझी भावंडे आहेत? काय रे, तुझ्या बापूसाला दुसरा काही उद्योग होता की नाही? आं? आणि बापूसाचे जाऊ दे तुझ्या. असतो एकेकाचा दम, पण तुझ्या आयशीचा तर विचार करशील? खुळा की काय तू बाळीशा? म्हणे भावंडे आहेत! काय? काय ते? हां, हां, या पंक्तीतले म्हणतो आहेस होय! आता आलं ध्यानात. म्हणजे ही पंगत म्हणजे रस्त्यात पसरलेली एक गाय आहे आणि आपण सगळी तिच्या आचळांना लुचणारी वासरे आहोत असं म्हण की. बाळीशा, कसं होणार रे तुझं या जगात? अरे, अरे, कोंबडीचे एक पिल्लूदेखील दुसऱ्यासारखे नसते रे! आणि तुला जरा चार लोक आसपास जमले की सगळे भाऊ आणि बहीणी वाटायला लागतात! त्याचं काय आहे बाळीशा, मराठी माणूस एकंदर भाबडाच. काही म्हण तू. जरा कुठे चार लोकांच्या ओळखी झाल्या की लागले लगेच हुंदके द्यायला. 'माझं माहेरच मला सापडलं गं बाई', 'कशे गं मला माझे सोयरे मिळाले, नाहीतर एवढ्या मोठ्या जगात मी कुठे गं बाई गेले असते? ' नाही, नाही बाप्यामाणसांचीही हीच गत असते बाळीशा. अरे, कुणाला कशाचा पत्ता असत नाही आणि लोकांना जन्मजन्मांतरीची नाती सापडतात, आहेस कुठं तू? अरे, असं कसं असेल जगात बाळीशा? आता हे बघ, अळूच्या भाजीला हातपण लावला नाहीस तू आणि तो समोरचा ढेरपोट्या बघ कसा अळू भुरकतोय ते! अरे, असं कमीजास्त चालायचंच समाजात! नाही का? मगाशी काय तुझा देस का कुठला राग सुरू झाला आणि ते काका पुंगी वाजवल्यासारखे डोलायला लागले. आणि तू? बाळीशा, त्या रागातल्या तानांइतक्याच मोठ्या आयायाया अशा जांभया द्यायला लागलास! ते मगाशी कुणीतरी अस्वलं की मगरी की पाली यांच्यावर अगदी भरभरून बोलत होतं आणि इथं तो केसाळ वास आठवून मला ढवळून आलं. आणि ते काका? सांगत होते बघ ते आपल्या लहानपणाच्या आठवणी! आणि हे फिरकीकर मला इकडे म्हणतात कसे! म्हणे यांना कान्होपात्रेचा अभंग म्हणून दाखवा हो कुणी. म्हटलं कुठला बुवा? तर म्हणे 'नको देवराया अंत असा पाहू.. ' खि खि खि... असे कसे रे सगळे लगेच भाऊ आणि बहिणी होतील? आता बघ, मटणाचा लालभडक रस्सा.. हां, हां लाळ आवर आधी तोंडातली - तर रश्श्याचं नुसतं नाव काढलं तर बाळंत व्हायला तयार होशील तू, आणि तो कवनउधार? 'प्राण्यांची प्रेतं, प्राण्यांची प्रेतं' म्हणून गोमगाला कर सुटेल बघ! अरे हे चालायचंच! एका पंगतीला जेवायला बसलास म्हणून लगेच एकमेकाच्या गळ्यात पडायला नको काही! काय?
लांगूलचालन होय? कुणी सांगितला तुला हा शब्द? म्हणजे असं बघ बाळीशा, आता तू या पंगतीत जेवायला बसलायस की नाही, मग इथल्या यजमानांना म्हणायचं, की धनी, काय तुमचं करवतकाठी धोतर, काय तुमच्या उपरण्याचा थाट आणि तुमच्या गुटगुटीत तनुची तर दृष्ट काढून टाकायला पाहिजे हो! हो, अहो, सगळ्या नजरा काही चांगल्या नसतात! तर हे झालं इथलं! आता पलीकडे गेलास की तिथल्या यजमानांना म्हणायचं, व्वा! सूट असावा तर असा! आणि टायचा सामोसा बांधायला तर खुद्द लॉर्ड माउंटब्याटन तुमच्याकडूनच शिकला असावा. हंगाश्शी! आता आलं बघ तुझ्या ध्यानात. असं जिथं जाईल तिथं 'सजनाकी वारी वारी जाऊंगी मैं, तूही मेरा यार है' असं म्हणत रहायचं. कशासाठी? आता ते मी काय सांगू बाबा? तुला डोक्यावर पान पडल्यावर 'आभाळ पडतंय, पळा पळा' म्हणणाऱ्या सशाची गोष्ट माहिती आहे ना बाळीशा? बास... बास. लाज? अरे यात लाज वाटण्यासारखं काय आहे बाळीशा? तू ना, अजून अडाणी तो अडाणीच राहिलास बाळीशा! इतके दिवस माझ्याबरोबर राहून काही म्हणजे काही शिकला नाहीस! अरे जगात अशी लाजबीज बाळगून चालत नाही c उलट गावगन्ना करून चारचौघात असं सांगायचं असतं - मी ना, मी जिथ्थं जाईल तिथ्थं त्यांचा त्यांचा उदोउदो करतो. आं? काय म्हणालास? करते? हं... बरंच बारीक लक्ष असतं हो तुझं. शिक, शिक जरा त्या सपकसुप्रियेकडून... कातडी गेंड्याची असावी लागती बाबा. शिकशील हळूहळू...
आणि हे काय? तू कुठे निघालास मध्येच उठून? काय? तो पंगतीतनं कुणीतरी उठून चाललाय त्याला थांबवायला पाहिजे म्हणतोस? वेडा रे वेडा! अरे, असं कुणी कुठून उठून जात नसतं बाळीशा! अधनंमधनं असं म्हणत रहायचं असतं, आता कंटाळा आला, आता निवृत्तच होतो... मग कुणीतरी धावत येतो आणि म्हणतो, अरे अरे अरे, तुम्ही नसाल पंगतीत तर काय मजा? असं करू नका बुवा. या बरं परत. पण पुढच्या बुधवारी मी जातो म्हणणार आहे, तेंव्हा मला आडवायला यायचं हं. मग उंटावरनं झुलत झुलत, मुजरे स्वीकारत परत यायचं असतं बाळीशा. अरे, अशा फुकटच्या जेवणावळी चुकवून चालेल का? बाकीच्यांचं जाऊ दे, यजमान स्वतःच मगाशी पंगतीत म्हणून गेले बघ. मंडळी, ही शेवटची पंगत, इथून पुढं जमलं तर चालवीन ही जेवणावळ, नाहीतर बंद करून टाकीन. दुनिया गेली बा... अम्म अम्म.. असो. अजून बच्चा आहेस तू बाळीशा. वेवहार म्हणजे काय हे कळणार नाही तुला इतक्यात. अरे, जगात रहायचं तर हे सगळं करायला लागतं! काय समजलास
Tuesday, August 12, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
ek kaul takala hota pan to tithun udala:
sarapanch ya padasathi layak umedwar kon
1. visoba khechar
2. madhavi gadgil
3. prajakti
4, ishwari
5. madhu malushte,
6. gamatya
7. narayani
8, rajmudra
9. nana chengat
10. varil sarva karan he dashavtari natak ahe
lai majja yetey rao..ajun asala kahi asel tara taka lavkar lavakar
ROTFL :)))))
This style is very popular :)
Mr. Diwakar Natyachhatavale laee bhaaree kee ho.
बाळीशा भाग २
अरे असं काय करतोयंस बाळीशा. नाही मिळाले तुला मराठीच्या पेपरात जास्त गुण म्हणून इतकं का हिरमुसायचं? अरे थोडी तयारी केली की कोणालाही पास होता येतं. इतके दिवस माझ्यासोबत राहूनही तू बाकी फारच हळवा राहिलास बेट्या. थांब मी जरा तुला थोडंस समजावूनच सांगतो. तू काळजीपूर्वक बघितलंस का पेपराकडं? तुला सहसंदर्भ स्पष्टीकरणाचे गुण मिळाले नाहीत म्हणून तुझा एकंदर स्कोअर खाली आला बघ.
काय म्हणतोस? तुला संदर्भासह स्पष्टीकरण जमत नाही? किती रे वेंधळा तू बाळीशा! संदर्भासह स्पष्टीकरण हा तर भलताच सोपा प्रश्न. उदाहरण देऊ म्हणतोस? तू बाकी खरा वेंधळा आहेस की वेंधळ्याचे सोंग घेऊन वावरत आहेस हेच समजत नाही बाळीशा.
ठीक आहे. आपण ग्रेस यांची 'तुला पाहिले मी' ही कविता घेऊ.
तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
मी तुला नदीच्या किनारी पाहिले तेव्हा तुझे केस पाठीवर मोकळे होते. इथे नदीचे नाव दिलेले नाही त्यामुळे ग्रेस यांच्या कवितेचा संदिग्धपणा अधोरेखित झाला आहे. शिवाय 'केस मोकळे' म्हणण्याऐवजी 'केस पाठीवरी मोकळे' असे म्हटले आहे. कवितेच्या हिरॉईनचे केस हे लांबसडक आहेत. लांबसडक केसांची मजा काही औरच. अगदी 'सुंदर लंबे काले बाल, घने घने मतवाले बाल, डाबर आंवला केश तेल' या अतिमधुर गाण्याची आठवण येते. काय कोमल ऋषभ आणि गंधार लावला आहे त्यात. असो. त्या गाण्यातील सौंदर्यस्थळे पुन्हा कधीतरी...
तुझी पावले गे धुक्याच्या महाली
ना वाजली ना कधी नादली
निळा गर्द भासे नदीचा किनारा
न माझी मला अन तुला सावली
ओहोहो... तुझी पावले धुक्याच्या महाली कधी वाजली नाहीत वा नादली नाहीत.
नदीचा किनारा निळा गर्द भासतो आणि माझी मला आणि तुझी तुला सावलीही नाही.
धुक्याचा महाल असे म्हटल्याने कवितेचा धूसरपणा अधोरेखित होतो.संगीत हा ह्या परमसृष्टीचा जीव की प्राण आणि संगीताची मजा आवाजावर अवलंबून असते. मात्र पावलांचा आवाजही न आल्याने कवितेला एक गूढत्त्व प्राप्त झाले आहे असे वाटते. नदीचा निळा गर्द किनारा या उपमेतून ग्रेस यांच्या स्वप्नील प्रतिभेचा प्रत्यय येतो.
आजकाल प्रदूषणामुळे सर्व नद्यांची वाट लागली असली तरी ग्रेस यांना नदीचा गर्द निळा किनारा दिसत आहे. झाडे तोडून लोकांनी पर्यावरणाचीही वाट लावल्याने एकमेकांच्या सावल्या घ्याव्यात म्हणावे तर त्या सावल्याही नाहीत. ग्रेस यांनी बहुधा दुपारी बारा वाजता ही कविता लिहिली असावी. सूर्य डोक्यावर असल्याने यावेळी सावली पडत नाही.
आता आपण थेट शेवटच्या ओळीकडे जाऊत.
तमातून ही मंद ता-याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा
क्या बात है.. ! 'तमातून ही मंद ता-याप्रमाणे दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा" अशी ओळ. बिलवरांचा चुडा तमातूनही मंदतार्याप्रमाणे दिसतो... क्या बात है..! किंबहुना लोडशेडिंगच्या या दिवसांमध्ये आय मीन रात्रीमध्ये लोकांच्या डोळ्यांपुढे तारे चमकले असले तरी ग्रेस यांच्या डोळ्यांपुढे बिलवरांचा चुडा आहे.
असो, एक हृदयाला हात घालणारं गाणं! एखाद्या सर्जनशील, संवेदनशील चित्रकराला हे गाणं नुसत ऐकून हातात कुंचला घ्यावासा वाटेल आणि त्याच्या कॅन्व्हासवर डौलाने जाणारी ती छानशी पाठीवर मोकळे केस घेऊन जाणारी तरूणी उतरेल.. त्या चित्रात पार्श्वरंग असतील पर्यावरणाचा नाश, नदीचे वाटोळे आणि लोडशेडिंगच्या संकटाचे !!!
बघितलंस बाळीशा झाले संदर्भासह स्पष्टीकरण लिहून.
काय म्हणतोस? अगदी नि:शब्द झालास हे वाचून!!
अरे किती रे चांगला तू बाळीशा. मी अगदी कॄतज्ञ आहे बघ.
तू म्हणून मी ही युक्ती इथे सांगितली. मराठीचा पेपर जाऊदेबस. पुढे मागे मराठी संकेतस्थळांवर गुणग्राहक व्यक्तिमत्त्व म्हणून वावरशील बेट्या. अरे अशी रसग्रहणे पाडायची म्हणजे फक्त बैठक पक्की असावी लागते. एकदा बूड जमवले बसल्या बैठकीत दोनचार लेखही सहज पाडशील, म्हणताम्हणता लोकप्रिय होशील.
लोक प्रतिसाद देणार नाहीत? काळजी नको! लोक प्रतिसाद देतातच. पानवाला जसा पानावर चुन्याचे बोट लावून ठेवतो तसे लेखात ठिकठिकाणी कोमल, द्रुत, गंधार, ऋषभ अशी बोटे पुसून ठेवायची. मंडळी सगळ्यात जास्त कशाला घाबरत असतात तर आपले अज्ञान उघडे पडेल याला. अशी रंगीत बोटे बघितली की आपोआप प्रतिसाद टपाटपा पडतील.तरीही प्रतिसाद मिळाले नाही तर? फारच शंकेखोर बुवा तू. सपकसुप्रियेला भेटला होतास काय? हा हा.
अरे एकदोन वेगळ्या नावाचे आयडी हाताशी ठेवायचे. शक्यतो स्त्रियांची नावे घ्यायची आणि त्या आयडीमधून "वा बाळीशा काय हो तुमचं लिखाण हापूस आंब्यासारखं यम्मी" असले प्रतिसाद द्यायचे.
उदा. मीनल हाच आयडी घे. हां आता तुला तो आयडी घेता येणार नाही. सरपंचांनी आधीचे घेऊन ठेवलाय तो!
मीनल, प्राजक्ती, पल्लवी असे आयडी वापरून, "मला या लेखात पूर्वीसारखी मजा आली नाही" असे म्हणायचे. आणि मग खाली "शक्य आहे. या गाण्यात मी केवळ पर्यावरणविषयक सौंदर्यस्थळे उलगडवून दाखवली होती" असे स्पष्टीकरण द्यायचे.
काय म्हणतोस? खोटारडेपणा? कित्ती रे भोळा तू बाळीशा. जरा चारचौघात उठबस करायला शिक. तुझ्या पुस्तकी ज्ञानाचा इथे उपयोग नाही. थोडे व्यावहारिक ज्ञानही हवे. काय समजलास?
Post a Comment